कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात यंदा बोटावर मोजण्याइतक्या ठिकाणी गुऱ्हाळघरे सुरू आहेत. यात तालुक्यात बसरेवाडी, वाघापूर, गंगापूर, मडूर या चार गावांचा समावेश आहे. एकेकाळी तालुक्यात पंचवीस ठिकाणी सुरू असणारा गुऱ्हाळ उद्योग अनंत अडचणींमुळे अंतिम घटका मोजत आहे. भुदरगड तालुका पूर्वी गुळ उद्योगासाठी प्रसिद्ध होता. तालुक्यात अनेक गावांत गुऱ्हाळघरे अस्तित्वात होती. साधारणतः दिवाळी ते गुढीपाडवा यादरम्यान गुऱ्हाळघरे सुरू व्हायची. गावागावांत शेकडो लोकांना गुऱ्हाळघरांत रोजगार मिळायचा. आता गुळदरात होत असलेली परवड, कामगारांचा तुटवडा आणि वाढता उत्पादन खर्च अशा अनेक संकटांचा यावर परिणाम झाला आहे.
बसरेवाडी (ता. भुदरगड) येथील गुऱ्हाळमालक अमर पाटील यांनी मोजक्या व घरच्या लोकांच्या मदतीने परिसरात एकमेव गुऱ्हाळघर टिकवून ठेवले आहे. सध्या येथील पाटील यांनी गुऱ्हाळघर अडचणी असतानाही सुरू ठेवले आहे. या गुऱ्हाळ घरासाठी त्यांच्या घरातील व तुटपुंजे कामगार लोक राबत आहेत.चालू हंगामात अनेक शेतकरी येथे ऊस आणत आहेत. कामगार तुटवडा, यासह वाढती महागाई व गुळाला मिळत नसलेला दर यामुळे गुऱ्हाळघरे अडचणीत आली आहेत. शासनाने गुऱ्हाळ उद्योगाला संजीवनी देणे काळाची गरज आहे, अशी मागणी गुऱ्हाळचालकांकडून करण्यात येत आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.