कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील गंगानगर येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची ११ मे रोजी फेरनिवडणूक होणार आहे. २०२४-२०२५ ते सन २०२९-२०३० या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. २९ एप्रिल ते ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ५ मे रोजी अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. ६ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ११ मे रोजी मतदान होऊन १२ मे रोजी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होणार आहे. १४ मे रोजी सहकार निवडणूक प्राधिकरण, दिल्ली यांच्या मान्यतेनंतर निकाल जाहीर करण्यात येईल. पंचगंगा साखर कारखान्याचे सभासद १३९६० अ वर्ग, ११८८ ब वर्ग व्यक्ती, १०५ ब वर्ग संस्था अशी मतदार संख्या आहे. यातील अ वर्ग उत्पादक गटातून सर्वसाधारण १२, महिला २, अनुसूचित जाती जमाती १, बिगर उत्पादक व्यक्ती १ व संस्था १ अशा १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
दोन महिन्यांपूर्वीच झाली होती बिनविरोध निवडणूक
पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक दोन महिन्यापूर्वी होऊन एकूण १७ संचालकांच्या निवडणुकीसाठी १७ अर्जच शिल्लक राहिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी १९ जानेवारीच्या निवडणूक सभेत जाहीर केले होते. त्यास मंजुरी मिळण्याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरण दिल्ली यांना २१ जानेवारी रोजी कळविले होते. दरम्यान, निवडणुकीसाठी सभासदांनी भरलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करताना पोटनियमानुसार निवडणुकीच्या पाच वर्षांच्या कालावधीत सलग ४ वर्षे ज्या सभासदाचा ऊस कारखान्याकडे गळितास आला नसेल, त्यास अपात्र ठरविण्यात आले होते. तसेच त्या सभासदाचा ऊस इतर कारखान्याकडे गळितास गेला असेल, त्याचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरविला होता. उमेदवाराचे सूचक व अनुमोदक असणाऱ्या सभासदाचा ऊस सलग चार वर्षे आला नसेल व त्याचाही ऊस इतर कारखान्यास गळितास गेला असेल तर त्या उमेदवाराचा अपात्र ठरविला होता.