कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. विरोधी गटाच्या प्रमुख रजनीताई मगदूम यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारली. यामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊन २२ दिवसांचा कालावधी लोटला आहे. पण, अद्याप केंद्रीय सहकार प्राधिकरणाने बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांच्या यादीवर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे पदाधिकारी निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
हातकणंगले, शिरोळ आणि सीमाभागातील शेतकऱ्यांसाठी दिवंगत रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्थापन केलेल्या कारखान्याचे गेल्या काही वर्षांपासून नेतृत्व पी. एम. पाटील करीत आहेत. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्याला २२ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड झालेली नाही. हा कारखाना मल्टिस्टेट कायद्याखाली नोंदणी आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय सहकार प्राधिकरणाकडून संचालक मंडळाच्या यादीवर मंजुरीची मोहर उमटणे आवश्यक आहे. त्यानंतर नवीन पदाधिकारी निवड होणार आहे. पदाधिकारी निवड लांबणीवर पडल्याने नूतन संचालक मंडळात अस्वस्थता निर्माण झाली आहे.