कोल्हापूर: आप्पासाहेब नलवडे ४ गडहिंग्लज साखर कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या राखेचा नागरिकांना त्रास होत असल्याबद्दल हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कारखान्यासमोर आंदोलन केले. चर्चेनंतर कारखाना व्यवस्थापनाने लेखी हमी दिल्याने आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. या आंदोलनात सरपंच साधना आयवाळे, सदस्या वर्षा गुरव, सुषमा कुंभार, शशिकांत चौगुले, संजय नाईक, रत्नाबाई सावरे, चंद्रकांत राजे, राजेंद्र पताडे, अर्जुन पाटील, सूरज पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. हरळी खुर्द गोडसाखरमधून बाहेर पडणारी राख बंद करावी, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी कारखान्याचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी चर्चा केली.
दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील, काशिनाथ कांबळे, अशोक मेंडुले, बाळासाहेब देसाई व बसवराज आरबोळे यांच्या शिष्टमंडळाने आंदोलकांशी चर्चा केली. चिमणीतून राख बाहेर पडू नये यासाठी उपाययोजना केली आहे. त्याचे कामही सुरू आहे. लवकरच ठेकेदाराला बोलावून घेऊन हे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातील. महिनाभरात हा प्रश्न संपेल. मळीमिश्रित पाणी कारखान्यातून बाहेर जातच नाही. हे पाणी ईटीपी प्रकल्पामध्ये प्रक्रिया करून पुन्हा वापरले जाते. शेतवडीतील पाण्याची पाहणी करून ते थांबवण्याबाबत उपाययोजना करण्यासह ग्रामपंचायतीचा कर तत्काळ भरला जाईल, अशी लेखी ग्वाही शिष्टमंडळाने दिली.