कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ऊस उत्पादनात अग्रेसर असला तरी एकरी तीस टनच उत्पादन क्षमता आहे. माती परीक्षणाचे आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय खते वापरल्यास ऊस उत्पादन दुप्पट होईल. माती परीक्षण करून आधुनिक ऊस शेती केल्यास उत्पादनवाढ शक्य आहे, असे मत कृषी संशोधक अरुण देशमुख यांनी दिला. करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे पांडुरंग सांस्कृतिक भवनमध्ये भोगावती साखर कारखान्यातर्फे आयोजीत आधुनिक शेती चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब बुगडे होते. अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, देशमुख म्हणाले की, उसाच्या विक्रमी उत्पादनासाठी जमिनीच्या पूर्वमशागतीपासून तोडणीपर्यंत नियोजन महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रतीच्या रोपांची निवड, लावण, खत व पाणी व्यवस्थापन योग्य पध्दतीने केल्यास अधिकाधिक उत्पादन घेणे शक्य आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास न धरल्याने एकरी तीस टन ऊस उत्पादन मिळत आहे. हे बदलण्यासाठी साडेपाच फुटाची सरी, जमिनीची सुपिकता, सेंद्रिय कर्ब वाढ, रुंद सरी पद्धतीने लागवड, दर्जेदार बेणे निवड, बेणे प्रक्रिया, शिफारशीत खत मात्रा या सर्वची गरज आहे. यावेळी करवीर तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार यांनी शेतकरी विमा व अन्य योजनांची माहिती दिली. कुंभार व दिनकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील, शेती विकास अधिकारी साताप्पा चरापले यांनी मनोगत व्यक्त केली. कारखान्याचे उपाध्यक्ष राजू कवडे, केरबा पाटील, अक्षय पवार पाटील, शिवाजी कारंडे, धैर्यशील पाटील, बाबासाहेब देवकर, धीरज डोंगळे, अमित कांबळे, विलास पाटील आदी उपस्थित होते.