कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा विळखा कायम आहे. जिल्ह्यात भात, ऊस, सोयाबीन, भुईमुग पिक पाण्याखाली आहे. याचा सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला आहे.जिल्ह्यात 300 हून अधिक गावांमधील अंदाजे 25 हजार हेक्टर पिकाऊ शेती पुरात बुडाली आहे.आणखी काही दिवस पुराचे पाणी ओसरले नाही, तर पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.नदीकाठच्या ऊस पिकला सर्वाधिक फटका बसला आहे.सुरळीत पाणी गेल्याने आणखी काही दिवस ऊस पीक पाण्यात राहिल्यास तो कुजण्याची शक्यता आहे.
दूधगंगा, कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने हजारो हेक्टर पिके धोक्यात आली आहेत. करवीर तालुक्यात आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे, बालिंगे, पाडळी खुर्द, वडणगे, शिंगणापूर, केलों, पाडळी बुद्रुक, आडूर, चिंचवाड, गांधीनगर, आरळे, कळंबे तर्फ कळे, नागदेववाडी, सांगरूळ, कुडित्रे, शिये, कोपार्डेसह अन्य अनेक गावातील उसासह अन्य पिके धोक्यात आली आहेत.करवीर पाठोपाठ गगनबावडा,राधानगरी, हातकणंगले,शिरोळ,पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील पिकालाही पुराचा तडाखा बसला आहे.
तीन वर्षांपूर्वी 2021 मध्ये महापुरात जिल्ह्यातील 70 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली गेले होते. यंदा तुलनेने महापुराचा कमी फटका बसला आहे. असे असले तरी सोयाबीन थेट कुजायलाच सुरुवात झाली आहे.पूर ओसरल्यानंतर पंचनामे सुरू होणार आहेत.सरकारी निकषानुसार 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना भरपाई मिळते. मात्र, पाण्याखाली गेलेल्या सर्वच उसाला 100 टक्के भरपाई मिळणे गरजेचे आहे.याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी म्हणाले कि,जिल्ह्यात पूर आला असून या पुरात 300 हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत.पुराचे पाणी कमी होताच पंचनामे सुरु केले जाणार आहेत. पाणी कमी झाल्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकणार आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.