कोल्हापूर : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मनमानी अन् हुकूमशाही कारभार चालवला आहे. कोणत्याही संचालकाला, अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला विश्वासात न घेता जुलमी निर्णय डॉ. शहापूरकर यांनी घेतले. त्यामुळेच कारखान्याला ऊर्जितावस्था न मिळता कारखाना कर्जाच्या खोलात रुतला आहे. त्यांच्या कारभाराला कंटाळून संचालकपदाचा राजीनामा दिला जात असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील, विद्याधर गुरबे, प्रकाश पताडे, अक्षय पाटील, अशोक मेंडुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ मध्ये कारखान्याची निवडणूक लढवली. त्यावेळी प्रकाश शहापूरकर यांना बहुमताने चेअरमनपद दिले. पण शहापूरकर यांनी हुकूमशाही आणि मनमानी कारभार केला. निवडणुकीनंतर पहिल्या वर्षी कारखाना बंद राहिला. गेल्यावर्षी जिल्हा बँकेकडून ५५ कोटी रुपये कर्ज घेऊन कारखाना सुरू केला. पण पक्त १ लाख ३८ मे. टन गाळप झाले आणि सुमारे २० ते २५ कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यांच्यामुळेच कारखान्याची अधोगती सुरू आहे असा आरोप संचालक सतीश पाटील यांनी केला. चेअरमन शहापूरकर यांनी सुमारे सात ते आठ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संचालक प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे यांनी केला आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.