कोल्हापूर : महाराष्ट्र ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेतर्फे गुरुवारी आयोजित मेळाव्यात जिल्ह्यात ऊस तोडणी, वाहतूक कामगारांच्या मुला-मुलींसाठी चार वसतिगृहे सुरू करावीत, अशा मागणीचा ठराव करण्यात आला. प्रा. सुभाष जाधव अध्यक्षस्थानी होते. शाहू स्मारक भवनात झालेल्या सभेत एकूण पाच ठराव करण्यात आले. ऊस तोडणी, वाहतुकीच्या दरात ३४ टक्के वाढीच्या कराराबाबत यश मिळाल्याबद्दल विजयी मेळावा झाला.
‘सीटू’च्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ऊस तोडणी वाहतूक कामगारांनी लढा केल्यामुळे ३४ टक्क्यांची वाढ मिळाल्याबद्दल सर्व कामगारांचे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव अॅड. अमोल नाईक यांनी अभिनंदन केले. यावेळी ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळात नोंदणी करून ओळखपत्र द्यावीत, कल्याणकारी महामंडळाचे लाभ सुरू करावेत, ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेची बांधणी मजबूत करावी आणि अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, गटप्रवर्तकांच्या संपास सक्रिय पाठिंबा देण्याचा ठराव झाला. दिनकर आत्मापुरे, आनंदा डफळे, महादेव गुरव, रामचंद्र कांबळे, अशोक गुरव, सुरेश चौगुले, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते. ज्ञानदेव वंजारे यांनी आभार मानले.