कोल्हापूर : तापमानवाढ हा कृषी क्षेत्रासाठी चिंतेचा विषय बनला आहे. हवामानातील बदलांमुळे पूरपरिस्थितीसह गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत आहे. त्याचा फटका प्रामुख्याने ऊस पिकाला बसत आहे. वाढते तापमान, असमाधानकारक पर्जन्यमान, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि गारपीट यामुळे ऊस उत्पादनात घट होत आहे. तापमान वाढीचा कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येत आहे.
गारपीटीसारख्या घटनांवेळी उसाच्या खोडांवर जखमा होऊन त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. तर तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास झाडांची उपजत क्षमता कमी होते. उच्च तापमानाच्या प्रभावामुळे पाने पिवळी पडणे, पाने जळणे, तसेच मुळांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता घटत आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. हवामान अनुकूल एकात्मिक पीक संरक्षण तंत्रांच्या अवलंबासाठी प्रयत्न करावे लागतील आणि रोगप्रतिकारक वाणांची निर्मिती आणि वापर आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याबाबत ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तापमान वाढल्यामुळे उसाच्या साखर निर्मिती प्रक्रिया बाधित होऊन, रसातील साखरेचे प्रमाण कमी होते. उच्च तापमानात रात्रीच्या वेळी श्वसनक्रिया वेगाने होत असल्याने ऊसामध्ये साखरेचे प्रमाण कमी राहते. साखर उद्योगावरही मोठा परिणाम होतो असे पुणे कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉ. संतोष यादव व डॉ. श्रद्धा बगाडे आणि मांजरी फार्ममधील कृषी तंत्र विद्यालयातील सुवर्णा नवसुपे यांनी सांगितले. या तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही पिकाच्या उत्पादनामध्ये प्रकाश संश्लेषण ही महत्त्वाची प्रक्रिया असते. मात्र तापमान अधिक झाल्यास प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे परिणामी झाडांची अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते. उसाच्या वाढीचा वेग कमी राहिल्याने उसाची उंची अपेक्षेपेक्षा कमी राहते. त्यामुळे वाढत्या तापमानाचे परिणाम नियंत्रित ठेवण्यासाठी उष्णतेला सहनशील जाती विकसित करणे, वहनादरम्यान आणि बाष्पीभवनाद्वारे होणारे पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी ठिबक सिंचन तंत्राचा अवलंब करणे, सावली व्यवस्थापन, पिकावरील अन्य जैविक ताण कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी राहील, यासाठी प्रयत्न करणे आणि पीक संरक्षणाच्या वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी जलनियंत्रण व्यवस्था, जलसंधारण तंत्रज्ञान, हवामान आधारित पीक सल्ला सेवा आणि गारपीट प्रतिरोधक जाळ्यांचा वापर करणे गरजेचे आहे.