कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याकडे गत हंगामात १६ जानेवारी ते २२ फेब्रुवारीअखेर गाळपा-साठी आलेल्या उसास प्रतिटन ३१०० प्रमाणे होणारी ४४ कोटी १३ लाख २५ हजार ९९९ रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. शासनाकडून तोडणी-वाहतुकीचा खर्च निश्चित होताच ऊस बिलाची फरक रक्कमही देऊ, अशी ग्वाही अध्यक्ष माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
यंदा कारखान्याने ३ लाख ७ हजार ५६६ मे.टन उसाचे गाळप करून ३ लाख ३६ हजार ८७० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १२.४८ टक्के मिळाला आहे. ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांची १५ फेब्रुवारीपर्यंत तोडणी, वाहतूक बिले बैंक खात्यात जमा केली आहेत. शेतकरी, तोडणी-वाहतूक कंत्राटदार, सर्व कामगार, अधिकारी, सर्व संचालक यांचे सहकार्य लाभल्यानेच हंगाम यशस्वी झाला, अशी कृतज्ञता मंडलिक यांनी व्यक्त केली. उपाध्यक्ष आनंदा फराकटे, शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, विश्वासराव कुराडे, धनाजी बाचणकर, विरेंद्र मंडलिक, सत्यजित पाटील, महेश घाटगे, एन. वाय. पाटील आदी उपस्थित होते.