कोल्हापूर : साखर कारखान्यांतील इलेक्ट्रॉनिक वजनकाटे तपासणी प्रक्रियेत संगनमताने सर्वांनी गैरव्यवहार केला आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने केला आहे. याबाबत संबंधीतांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सहसंचालक मावळे यांनी मला कारवाईचा अधिकार नाही. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आश्वाासन दिले. संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रुपेश पाटील यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे की, साखर आयुक्त यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि नियंत्रक वैद्यमापन शास्त्र यांच्याकडे प्रस्ताव सादर करून एसओपी (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) मानक कार्यपद्धती घ्यावी. भरारी पथकांमार्फत साखर कारखान्यांतील ऊस वजन काट्यांची तपासणी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी करावी, असे म्हटले असले तरीही हंगाम संपताना तपासणीची मोहीम राबवली गेली. याबाबत आठ दिवसांत कारवाई न केल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला. शिष्टमंडळात अभिजित कांजर, राहुल पाटील, भीमराव पाटील, नागनाथ बेनके, दत्ता मेटील, सरदार पाटील, संभाजी साळोखे, शहाजी पाटील, लहू बरगे, आसीफ स्वार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.