कोल्हापूर / सांगली : यंदा पडलेल्या दमदाट पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नदीकाठची हजारो एकर ऊस शेती पाण्याखाली गेली होती. कित्येक दिवस ऊस पीक पाण्याखाली होते. त्याचे विपरीत परिणाम आता पहायला मिळू लागले आहेत. सततच्या पावसामुळे ऊसाच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून उसाची वाढ खुंटल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या दीड महिन्यापासून ऊस शेतीत सरीच्या सरी भरून पाणी तुंबून राहिले आहे. आता पावसाचे प्रमाण कमी झाले तरी जमिनीतून पाण्याचा उमाळा सुरूच आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरसह शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत महापुराचा उसाच्या वाढीवर परिणाम झाल्याचा दिसत आहे. पाणी साचून राहिलेल्या ठिकाणी उसाचे वजन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
उसाला अन्नद्रव्य मिळवून देणाऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ थांबल्याने परिणामी उसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. एक-दोन तासांनी जोरदार सरी पडत असल्याने पाण्याचे निचरा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. माळ रानावरील उसासाठी मात्र हा पाऊस दिलासादायक असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर येऊन गेल्यानंतर केवळ दहा ते बारा दिवस पावसाची उघडीप राहिली. यानंतर पुन्हा पावसास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी वाफसा येण्याआधीच पुन्हा शेतामध्ये पाण्याचे तळे झाले.