कोल्हापूर : चीनी मंडी साखर हंगाम सुरू होऊन एक महिना लोटला तरी, दक्षिण महाराष्ट्रातील एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. एकिकडे तयार साखरेला उठाव नाही, तर दुसरीकडे एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी वाढता दबाव, अशा दुहेरी संकटात साखर कारखाने सापडले आहेत. ही अवस्था छोट्या नव्हे, तर बड्या कारखान्यांचीदेखील आहे.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कोसळल्यामुळे साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर साखर शिल्लक आहे. त्यातच नवा हंगाम सुरू होऊन एक महिना झाला तरी, साखर विक्रीला अपेक्षित गती आलेली नाही. बाजारातून साखरेला मागणीच नसल्यामुळे हंगामाच्या पहिल्या महिन्यात तयार झालेल्या साखरेपैकी निम्मी साखरही विकली गेलेली नाही. त्यामुळे कारखान्यांवरील संकट आणखी गहिरे होत चालले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरलेले आहेतच, त्याचवेळी रुपयाचे मुल्यही ७४ रुपयांवरून ७० रुपये असे वाधरले. त्याचा परिणाम साखर निर्यातीवर झाल्याचे दिसत आहे. ज्या कारखान्यांची साखर बँकांकडे गहाण आहे. त्या बँका कमी किमतीला साखर निर्यात करण्यास तयार नाहीत. याबाबत अद्याप बँकांनी निर्णय दिला नसल्यामुळे त्याचा परिणाम साखर निर्यातीवर होताना दिसत आहे.
सरकारकडूनही साखर कारखान्यांना अनुदानाची रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी निर्यात केलेल्या साखरेचे अनुदान अद्याप साखर कारखान्यांना मिळालेले नाही. बफरस्टॉकचे अनुदानही सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत आहे. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर होत असल्याचे कारखाना व्यवस्थापनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची देणी भागवणे अशक्य होत आहे, असे कारखान्यांतील सूत्र सांगतात.
साखरेचा दर ३ हजार १०० रुपये करण्याची विनंती सरकारला करण्यात आली आहे. राज्य सरकारनेही पुढाकार घेत केंद्राकडे मागणी करण्याची ग्वाही दिली. पण, सरकारी पातळीवर याबाबत काहीच स्पष्टता दिसत नाही. सध्याचा विक्री तर २९०० रुपये असला तरी या दरालाही कोणी साखर खरेदी करत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे साखर कारखाने हतबल झाले आहेत. हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच ही परिस्थिती असेल, तर हंगाम कसा पार पाडायचा असा प्रश्न साखर कारखान्यांपुढे आहे.
पहिल्यांदाच आली वेळ
गेल्या काही वर्षांत साखर कारखाने इतक्या मोठ्या अडचणीत पहिल्यांदाच आले आहेत. ऊस गाळप केल्यानंतर पहिल्या महिन्याच्या आता पहिला हप्ता न देण्याची ही गेल्या काही वर्षांतील पहिलीच वेळ आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बड्या कारखान्यांनीदेखील या परिस्थितीपुढे हात टेकले आहेत. साखर कारखाने नियमितपणे सुरू असले, तरी शेतकऱ्यांची रक्कम भागवण्याच्या हालचाली सध्या तरी कोणत्याही साखर कारखान्यात दिसत नाहीत.