शिरोळ : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ मध्ये १० लाख ७० हजार ७५२ मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले आहे. कारखान्याचा साखर उतारा सरासरी १२.२९ इतका आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपीही वाढत असल्याने साखर उताऱ्यातून साखर उताऱ्यातून मिळणारी अधिकची रक्कम पारदर्शकपणे शेतकऱ्यांना मिळावी, याकरिता प्रतिटन ६० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर कारखाना व्यवस्थापनाने वर्ग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाला एकूण ३२०० रुपये मिळाले आहेत.
याबाबत कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले की, कारखाना व्यवस्थापनाने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी ऊस विकास योजना राबवून शेतीच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे. शासन नियमानुसार साखर उताऱ्यातील मिळणारी अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, फरकाची रक्कम मिळाल्याबद्दल शिरोळमधील शेतकऱ्यांच्यावतीने कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील व कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संचालक दरगू गावडे, गजानन संकपाळ, पंडित काळे, महादेव बिसुरे, सुभाष पाटील, बाळासाहेब कोळी, कृष्णा भाट, गजानन कोळी, तानाजी पाटील, केशव माने, सागर गावडे उपस्थि होते.