कोल्हापूर: जिल्ह्यात ऊस तुटून गेल्यानंतर पुन्हा लागण करण्यासाठी शेतकऱ्यांचा ऊसरोप लागणीकडे कल वाढला आहे. रोपवाटिकाकडे शेतकऱ्यांची ऊस रोपांची प्रचंड मागणी वाढल्याने रोपवाटिकेत ऊसरोपांची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी रोपवाटिकेत ऊसरोपासाठी अॅडव्हान्स बुकिंग करत आहेत. पूर्वी ऊस रोपांचा दर १ रुपये ७० पैसे रोपवाटिकेतून जागेवर पोहोच ऊसरोपांचा दर होता. तो आता २ रुपयांच्या वर पोहोचला आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील नावाजलेल्या आणि मोठी उत्पादन क्षमता असलेल्या रोपवाटिकाकडे तर ऊसरोपांची टंचाई निर्माण झाल्याने इतर तालुक्यातील ऊसरोपवाटीकेतही ऊसरोप टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान माळरानावर आणि आतील कसदार जमिनीत शेतकरी आडसाली ऊस लागणी करतात. पण या काळात उसाची कमतरता आहे. मुसळधार पावसाने लागणीसाठी जमिनीत लावलेली उसाची कांडी पावसाचे पाणी सरीत साचल्याने डोळे कुजून उगवण झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांची लागणीसाठी ऊसरोपांना सातत्याने मागणी वाढू लागली आहे. याबाबत कुडित्रेतील रोपवाटिका मालक उत्तम शेलार म्हणाले की, रोपवाटिकेतील रोपांची बियाणे प्रक्रिया व खतांचे डोस वेळेत मिळत असल्याने आणि लागणीला खर्च कमी येत असल्याने, शेतकऱ्यांची रोपांसाठी प्रचंड मागणी वाढली आहे. दरवर्षीपेक्षा ही दुप्पट झाली आहे.