कोल्हापूर : महापुरामुळे नुकसानीचे चटके सोसणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. शिरोळ तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. यामुळे उसाची पाने तांबूस व पिवळी पडत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी पिकाची अवस्था पाहून चिंताग्रस्त झाले आहेत.
जुलै-ऑगस्ट महिन्यातील सर्वत्र झालेल्या दमदार पाऊस व अधूनमधून होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे पिकावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. तांबेराने उसाची वाढ खुंटते. नवीन पानाची निर्मिती होत नाही. असलेली पाने पिवळसर पडून गळून जातात. संततधार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत नाही, त्यामुळे अन्न निर्मिती प्रक्रिया थांबली जाते. अशीच स्थिती सध्या दिसून येत आहे.
सध्या अनेक ठिकाणी ऊस गाळपासाठी जाणार असल्याने २५ ते ३० कांड्या ऊस तयार आहे. पाठीवरील पंपाने औषध फवारणी करणे शक्य नाही. त्यामुळे ड्रोनने फवारणी करावी लागणार आहे. यात विलंब झाल्यास तांबेराचा प्रादुर्भाव वाढून ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत रासकर यांनी सांगितले की, उसावरील तांबेरा रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि अधिक उत्पादनासाठी आझी ऑक्सिट्राबीन अक्षय रॉबिन १८.२ टक्के व डायफेल कोण्याझोल ११.४ टक्के एचएससी एक मिली प्रती लिटर पाणी या संयुक्त बुरशी नाशकाच्या तीन फवारण्या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने करण्याची शिफारस करण्यात आली आहे.