कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटनेच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ऊस तोडणी मजुरांची गोपीनाथ मुंडे कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून भरती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ऊस वाहतुकदारांनी निदर्शने केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात कृष्णा भोसले, सुभाष कोळी, विठ्ठल साबळे, विश्वास चौगले, विजय पाटील, प्रशांत राजबा यांच्यासह अन्य वाहतूकदार सहभागी झाले. दसरा चौकातून व्हीनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. फसवणूक केलेल्या ऊसतोडणी मुकादमांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी. फसवणूक झालेल्यांची नुकसानभरपाई शासन, साखर कारखाने व गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फत द्यावी, फसवणुकीविरोधात कायदेशीर कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवाडा समिती करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.