कोल्हापूर : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) ग्लोबल शुगर्स कारखान्याकडे चालू गळीत हंगामात १५ जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाची प्रतिटन ३१०० रुपयांप्रमाणे ऊस बिले ३ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली. युनिट हेड संतोष देसाई, शेती अधिकारी दत्तराज गरड उपस्थित होते. विनाकपात एकरकमी ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात असल्याने शेतकऱ्यांना विनाविलंब बिले मिळत असल्याचे सांगितले.
हंगामाच्या सुरुवातीपासूनची ऊस बिले शेतकऱ्यांना आदा केली आहेत. १५ जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी ३ फेब्रुवारीला कारखान्याकडून २१ कोटी ५७लाख ३४ हजार ७७८ रुपये बँकेत जमा केले जाणार आहेत. चालू वर्षी आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बँक खात्यावर बिले जमा केली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाविलंब ऊस बिले मिळत आहेत. ऊस बिले व वाहतूक, तोडणीचीही बिले वेळेवर देण्याचे नियोजन केले आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज व सीमाभागात ५०० च्यावर तोडणी यंत्रणा कार्यरत आहे. शेतकऱ्यांचा वेळेवर ऊस उचल करण्याचे शेती विभागाने नियोजन केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्याचे प्रयत्न केल्याचे सांगून कुंडल यांनी जास्तीतजास्त उसाचा पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.