कोल्हापूर : ऊस पिकाला ‘घोळी’ नावाच्या तणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून उसाच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. शेतीच्या बांधावर व रस्त्यावर शेतकऱ्यांनी काढून टाकलेल्या या तणाचे ढीग दिसत आहेत. भुदरगड तालुक्यातील कूर, मिणचे, हेदवडेसह परिसरात निम्म्याहून अधिक क्षेत्रांत या तणाचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यात ७ हजार तीनशे हेक्टरहून अधिक ऊस पिकाचे क्षेत्र आहे. मशागतीवर होणारा खर्च, वीज बिल आणि मिळणारा दर, मजूर पगार यांचे गणित पूर्णतः कोलमडले आहे. त्यातच ऊस पिकाच्या वाढीच्या नेमक्या कालावधीतच घोळी व अन्य तणाची उगवण होत असून पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम होत आहे.
घोळी तणामुळे शेतकरी तोट्यात आला आहे. निम्मा खर्च ऊस भांगलण करण्यात जात आहे. वर्षभरात मावा, तांबेरा या रोगांच्या प्रादुर्भाव याबरोबरच आता घोळी, मालवीय, खांडेकोळी नावाच्या तणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये या तणाची वाढ झपाट्याने होताना दिसते. जमिनीला चिकटूनच ती पसरते. त्यामुळे मुळासकट काढून टाकणे अशक्य बनते. काढून टाकलेली एक जरी कांडी राहिली आणि ती पूर्ण सुकलेली असेल तरीही शेतात पाणी दिल्यावर ती झपाट्याने पुन्हा वाढते. विशेषतः लागण आणि तोड झालेल्या उसाच्या वाढीसाठी हाच काळ पोषक असल्याने याच कालावधीत ही वनस्पती फोफावते.