कोल्हापूर : शाहूनगर- परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील दि. १ फेब्रुवारी ते १० मार्चदरम्यानच्या ऊस बिलापोटी ४७ कोटी ५१ लाख रुपयांची ऊस बिले उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहेत. ऊस तोडणी-ओढणी बिले व डिझेल फरकापोटी ६ कोटी २७ लाख रुपये वर्ग केले आहेत. कारखान्याने आतापर्यंत संपूर्ण हंगामातील ऊस बिलापोटी १३५ कोटी रुपये, तर तोडणी वाहतुकीचे २५ कोटी ७१ लाख रुपये पूर्णपणे दिले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.
कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसासाठी पहिला हप्ता प्रतिटन ३,२०० रुपयांप्रमाणे जाहीर केला आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत गाळप झालेल्या १ लाख ४८ हजार ४८१ मेट्रिक टन उसाच्या बिलापोटी ४७ कोटी ५१ लाख ४१ हजार रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. कारखान्याने ऊस तोडणी-ओढणी पुरवणी बिले, तसेच डिझेल फरकापोटी ६ कोटी २७ लाख रुपये संबंधितांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. कारखान्याने आतापर्यंत संपूर्ण हंगामातील ऊस बिले व तोडणी-ओढणी बिल व फरकापोटी १६१ कोटी रुपये अदा केलेले आहेत. कारखान्याने नुकत्याच संपलेल्या हंगामात ४ लाख २१ हजार ७८८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, आगामी हंगामासाठी सर्वांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे नोंद करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रा. पाटील व कवडे यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक आदी उपस्थित होते.