कोल्हापूर : ऊस दरप्रश्नी शिरोळ तालुक्यात ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्यावतीने ऊस तोडी बंद पाडण्यात येत आहेत. तालुक्यातील पाच ते सात गावांतील ऊस तोडी बंद करण्यात आल्या आहेत. आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील या गावातील ऊस तोडी पूर्णपणे थांबवल्या आहेत. अर्जुनवाड, चिंचवाड, टाकवडे, नांदणी, दत्तवाड, हसूर या गावातील ऊस तोडी रोखण्यात आल्या आहेत. सध्या शिरोळ तालुक्यातील ऊस तोडी निरंक ठेवण्यात आंदोलन अंकुशला यश आले आहे. यावर्षी तुटणाऱ्या उसाला प्रतिटन ३७०० रुपये जाहीर करावेत, गतवर्षीच्या उसाला प्रतिटन दोनशे रुपये द्यावेत अशी मागणी आंदोलन अंकुशने केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश या दोन संघटनांनी विधानसभा निवडणुकीआधी गतवर्षीच्या उसाचे प्रतिटन दोनशे रुपये, यावर्षी तुटणाऱ्या उसाला प्रती टन ३७०० रुपये मिळाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ द्यायचे नाहीत, असा इशारा दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी यासाठी ठोस भूमिका घेतली आहे. सद्यस्थितीत साखर कारखानदार हंगाम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी, दराबाबत मात्र चर्चा करायला तयार नाहीत. त्यामुळे दर जाहीर करून ऊसदराचा हंगाम सुरु कधी होणार? याकडे शेतकन्यांचे लक्ष लागले आहे. कारखानदारांनी मुहूर्तावर गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ केला आहे. गावांमध्ये ऊस तोडी दिल्या जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून याला विरोध होत आहे. ऊस दराचे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव सुरू आहे असा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.