कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १६ सहकारी व ७ खासगी असे एकूण २३ साखर कारखाने सुरू आहेत. कारखाने सुरू होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे. या साखर कारखान्यांनी चार फेब्रुवारीअखेर ९८,३५,८७३ मे. टन उसाचे गाळप करून १,०८,८७,२४१ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. हुपरीच्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने १० लाख ६८ हजार ९०० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे. तर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.११ टक्के आहे.
यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरनंतर सुरू झाले. गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत १६ सहकारी साखर कारखान्यांनी ७२,७३,१०५ मे. टन उसाचे गाळप करून ८१,११,७९४ क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत. सात खासगी कारखान्यांनी २५,६२,७६८ मे. टन उसाचे गाळप करून २७,७५,४४७ क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत. ऊस गाळपामध्ये तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने ९ लाख ४ हजार २५ मे. टन गाळप करून दुसरे स्थान मिळवले आहे. तर शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने त्याखालोखाल ७ लाख ८४ हजार २१० मे. टन उसाचे गाळप केले आहे.