कोल्हापूर : या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुका आणि हेतु पुरस्सर कारखानदारांनी लांबवलेल्या गळीत हंगामामुळे पहिल्या उचलीचा निर्णय न होताच साखर हंगाम सुरू झाला आहे. अशा स्थितीत ऊसतोड बंद आंदोलन करणे शेतकरी व कारखानदारांच्या हिताची गोष्ट नाही, हे जाणून आम्ही ऊसतोड व रस्त्यावरील आंदोलन केलेले नाही. मात्र, यंदाच्या गळीत हंगामाची पहिली उचल ३७०० रुपये प्रतिटन जाहीर करावी, अन्यथा हंगाम रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सावकर गटाने दिला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी, अपर जिल्हा पोलिस प्रमुख आणि साखर सहसंचालकांना बैठकीत गटाने हा इशारा दिला.
याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते सावकर मादनाईक म्हणाले की, आठ दिवसांत या मागणीबाबत कार्यवाही न केल्यास होणाऱ्या आंदोलनास प्रशासन जबाबदार राहील. गेल्या वर्षीपर्यंत शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्याचे विश्वस्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, साखर सहसंचालकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराची बैठक होऊन पहिल्या उचलेचा निर्णय होत होता. आता तसे झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. दर जाहीर करून कारखान्यांनी तोडगा काढावा. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर जालिंदर पाटील, मिलिंद साखरपे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, शैलेश आडके, सागर मादनाईक, सतीश हेगाण्णा यांच्या सह्या आहेत.