कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत साखर कारखान्यांचे राजकारण केंद्रस्थानी !

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यांमधील दौलत, गोड साखर व आजरा या सहकारी साखर कारखान्यांच्या स्थितीमुळे चर्चेत आली आहे. निवडणुकीमध्ये रस्ते, पाणी, वीज, गटर या नेहमीच्या समस्या आहेतच. याशिवाय, औद्योगिक वसाहतीत उद्योगांची वानवा, बेरोजगारांना न मिळणारी संधी तसेच अडचणीत आलेले साखर कारखाने हे विषयही केंद्रस्थानी येत आहेत. गडहिंग्लजचा गोडसाखर मागील काही हंगामांपासून समस्यांच्या गर्तेत आहे. चंदगडचा दौलत चालविण्यास दिला आहे. तर आजरा साखर कारखान्याची परिस्थिती म्हणावी तशी उत्तम नाही. त्यामुळे या तिन्ही कारखान्यांच्या समस्यांचा प्रभाव निवडणुकीत दिसणार आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी, महायुती व अपक्षपणे लढणाऱ्यांना ते ज्या तालुक्यात आहेत, त्यासोबतच अन्य तालुक्यांची परिस्थितीशी ताळमेळ जमवावा लागणार आहे. दोन तालुक्यांतील भौगोलिक परिस्थितीमुळे अस्मिता अधिक प्रखर झाल्या आहेत. तिन्ही तालुक्यांतील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे उद्योग नसल्याने तरुणांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे. शिवाय, चंदगडमधून लढणाऱ्या उमेदवारांना गडहिंग्लजकर आपलेसे करण्यास तयार नाहीत. तर गडहिंग्लजमधून लढणाऱ्यांना चंदगडकर स्वीकारण्यास तयार नाहीत. आजऱ्याचा एकच जिल्हा परिषद मतदारसंघ येथे समाविष्ट आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसह दोन्हीकडील बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here