कोल्हापूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. बरेच कारखाने १५ ते २० नोव्हेंबर या दरम्यान सुरूही झालेले आहेत. जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप एफआरपी निश्चित करून त्याप्रमाणे होणारा एकरकमी दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी तातडीने ऊसदर जाहीर करावा याबाबत संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे ऊसदर निश्चित करून तो जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र, किती दर मिळणार याची माहिती नसतानाही कारखान्यावर विश्वास ठेवून शेतकरी ऊस पुरवठा करत आहेत. साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी किंवा एकरकमी रक्कम जाहीर केली नसतानाही साखर आयुक्तांनी परवाने दिले आहेत. त्यामुळे कारखाने सुरू झाले तरी संबंधित शेतकऱ्याला उसाचा किती दर मिळणार हे न कळल्यामुळे त्याच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना तातडीने ऊसदर जाहीर करण्यासंदर्भात सूचना द्यावी, त्यासाठी संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाप्रमुख प्रा सुनील शिंत्रे, संजय चौगले, वैभव उगळे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, सुरेश चौगले, तालुकाप्रमुख युवराज पोवार, बाबासाहेब पाटील, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, सूरज दावणे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.