कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) तीन संचालकांनी विद्यमान अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्याविरोधात प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे अध्यक्ष अल्पमतात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या कर्जाचा विनियोग बेकायदा झाल्याची तक्रार उपाध्यक्षांसह सात संचालकांनी केल्यामुळे कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण सुरू आहे. महिन्यापूर्वीच शहापूरकरांवर मनमानीचा आरोप करून उपाध्यक्षांसह सहा संचालकांनी मुश्रीफांकडे राजीनामे दिले आहेत. त्यापाठोपाठ खोट्या राजीनाम्याच्या मुद्यावरून तिघांनी साखर संचालकांकडे धाव घेतली आहे. गेल्या वर्षभरातील घडामोडी पाहता कारखान्यात सत्ताबदल होण्याची शक्यता आहे.
कारखान्याला २०२३ मध्ये जिल्हा बँकेने ५५ कोटींचे अर्थसहाय्य केल्यामुळे कारखाना सुरू झाला; परंतु पुरेसे भांडवल नसतानाही इथेनॉल, डिस्टिलरी व कारखान्याचे आधुनिकीकरण, विस्तारीकरणाचे काम काढले. त्यामुळे हंगामाला उशीर होऊन अपेक्षित गळीत झाले नाही. उसाची एफआरपी देण्यासाठी ४० कोटींचे साखर तारण कर्ज घ्यावे लागले. दोन्ही कर्जे थकबाकीत गेल्यामुळे कारखान्याबरोबरच संचालकांचीदेखील कोंडी झाली आहे. तीन वर्षांच्या थकीत पगारासाठी कामगारांनी साखर विक्री रोखली आहे. अहमदाबादच्या ट्रस्टकडील ३०० कोटींचे बहुचर्चित कर्जही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे तोडणी वाहतुकीचे करार, मशिनरीची देखभाल दुरुस्ती खोळंबल्याने येत्या हंगामाचे काय होणार असा प्रश्न आहे. दरम्यान, उपाध्यक्ष चव्हाणांसह ६ संचालकांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. त्याप्रमाणे अध्यक्ष शहापूरकरही समर्थकांसह आपला राजीनामा मुश्रीफांकडेच देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरही पेच निर्माण होणार आहे.