कोल्हापूर : यंदाच्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १६ सहकारी व सात खासगी अशा एकूण २३ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. या २३ कारखान्यांनी १५ जानेवारीअखेर ७०,४०,७३१ टन उसाचे गाळप केले आहे. १५ जानेवारीअखेरील गाळप केलेल्या ऊस बिलाच्या एफआरपीपोटी कारखान्यांनी ३१ जानेवारीपर्यंत १,९२२ कोटी ३३ हजार एवढी रक्कम शेतकऱ्यांना आदा केली आहे. २३ पैकी ११ कारखान्यांनी एफआरपीची १०० टक्के रक्कम आदा केली आहे हे विशेष.
जिल्ह्यातील छत्रपती शाहू कागल, दत्त शिरोळ, जवाहर हुपरी, कुंभी कासारी- कुडित्रे, रेणुका शुगर पंचगंगा-इचलकरंजी, शरद नरंदे, अथणी शुगर-बांबवडे, दालमिया आसुर्ले पोर्ले, गुरुदत्त शुगर्स-टाकळीवाडी, ओंकार शुगर-फराळे, अथर्व इंटरट्रेड-दौलत या कारखान्यांनी १०० टक्के ऊस बिले दिली आहेत. तर अद्याप एफआरपीपोटी १३२ कोटी २६ लाख रक्कम शेतकऱ्यांना देय आहेत. जिल्ह्यात १५ नोव्हेंबरनंतर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून गळीत हंगामाने गती घेऊन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले. आता हंगाम हळूहळू अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे.