कोल्हापूर : आजरा येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यावर वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा झाला. विभागीय मोटर वाहन विभाग (आर. टी. ओ.) यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला. मोटार वाहन निरीक्षक अनिल भादवण यांनी वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रिफ्लेक्टरचे वाटप केले.
भादवण म्हणाले, गाळप हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर रेलचेल वाढली आहे. शेतकऱ्याचा ऊस कारखान्यापर्यंत व्यवस्थित पोहोच करणे वाहतूकदारांची जबाबदारी असते. परंतु वाहतूक करताना योग्यरीत्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करीत विना अपघात वाहतूक करावी. सहायक मोटर वाहन निरीक्षक स्नेहा देसाई यांनीही मार्गदर्शन केले.
कारखान्याचे संचालक संभाजी पाटील (हत्तीवडे), राजेंद्र मुरुकटे, अनिल फडके, ऊसपुरवठा अधिकारी अजित देसाई, केनयार्ड सुपरवायझर तुकाराम मोळे, शेती विभाग वरिष्ठ कारकून संदीप कांबळे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष एम. के. देसाई यांनी स्वागत केले. प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी प्रास्ताविक केले. मुख्यशेती अधिकारी युवराज पाटील यांनी आभार मानले.