कोल्हापूर : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यापासून फारकत घेतलेल्या नेत्यांनी ऊस दरासाठी साखर कारखान्यासह शासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने साखर कारखानदारांसोबत बैठक घेवून उसाच्या पहिल्या उचलीचा तोडगा काढावा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यावेळी या नेत्यांनी दिला आहे.
पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक यांच्यासह नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले जालंदर पाटील, जर्नादन पाटील, शैलेश आडके, सागर मादनाईक, वैभव कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याबाबत जालंदर पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात यंदा गळीत ऊस हंगाम सुरू होवून महिना होत आला तरीही अद्याप साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली आहे. उसाला ३७०० रुपये दर द्यावा अशी आमची मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत, ११ डिसेंबरपर्यंत तोडगा काढावा अन्यथा गाड्या अडवून ऊस वाहतूक रोखली जाईल असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पक्षीय अभिनिवेश, संघटना बाजूला सारून एकत्र आल्याचे जालंदर पाटील म्हणाले.