कोल्हापूर : गतवर्षी तुटलेल्या उसास दुसरा हप्ता २०० रूपये व चालू वर्षीच्या तुटणाऱ्या उसाला ३ हजार ७०० रूपयाची पहिली उचल द्या. यासंदर्भात कारखानदार व संघटनांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे बुधवारी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे कि, मागील ५ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यातच सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आदींच्या पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. किटनाशके, तणनाशकांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे.
सरकार हमीभाव जाहीर करते. पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतीमाल विकावा लागत आहे. परिणामी गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज हे दुप्पट झालेले आहे. राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला दिलेला शब्द पाळून संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजाराम देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, सचिन शिंदे, कोल्हापूर शहराध्यक्ष संदीप चौगुले आदीसह पदाधिकारी ऊपस्थित होते.