कोल्हापूर : जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तीन साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता ऊस फडांच्या पेटवापेटवीने झाली. या आठवड्यात गाळप हंगामाची सांगता होणार आहे. गेल्या पंधरवड्यापासून फडाला आगी लावूनच कारखान्याला ऊस नेला जात असल्याचे चित्र दिसत आहे. हंगामाच्या प्रारंभीच्या काळात संथ गतीने हंगाम सुरू झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. गळीत हंगामाच्या प्रारंभीच काही तांत्रिक बिघाडामुळे हंगाम लांबला. त्याचा विपरीत परिणाम ऊस वजन घटण्यावर झाला. तालुक्यात अलीकडच्या दशकात सुमारे १८ लाखांहून अधिक मे. टन उसाचे उत्पादन घेतले जाते. जानेवारीत निम्म्या उसाची वेळेत उचल झाली. उर्वरित उसाला मात्र वाईट दिवस आले. ५० टनापेक्षा अधिक ऊस असणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळेत ऊस पाठवला. तर दहा, वीस टन असणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस कलम करून आणि शेवटी जाळून द्यावा लागला.
चंदगड तालुक्यातील अथर्व संचलित दौलत साखर कारखाना, ओलम साखर कारखाना आणि इको केन म्हाळुंगे या तीन साखर कारखान्यांनी उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. तर गडहिंग्लज, आजरा, संकेश्वर, सतीश शुगर, हल्याळ, एम. के. हुबळी या कारखान्यांनीही चंदगड तालुक्यातील उसाची पळवापळवी केली. ‘अथर्व दौलत’ कारखान्याने आजअखेर गाळप ३ लाख ८४ हजार २७५ मे. टन गाळप करून ४ लाख ३७ हजार ४७० क्विटल साखरेचे उत्पादन घेतले. यावर्षी सरासरी उतारा १२.१७ टक्के राहिला. इको केन शुगरने आजअखेर ३ लाख ७हजार ६५५ मे. टनाचे गाळप झाले आहे. साखर उत्पादन ३ लाख ७२ हजार २७५ क्विटल झाले. सरासरी उतारा १२.१७ टक्के राहिला. ओलम कारखान्याकडे सक्षम तोडणी यंत्रणा असल्याचा फायदा झाला. गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तोडणी, ओढणी कामगारांनी आणि ऊस देऊन शेतकऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे साडेसात लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी झाल्याचे ‘ओलम’चे युनिट हेड भरत कुंडल यांनी सांगितले.