कोल्हापूर : जिल्ह्यात गळीत हंगामामुळे उसाच्या शेतांमध्ये वर्दळ वाढली आहे. मराठवाडा विभागातील हजारो तोडणी मजूर जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य अधिकारी चिंतेत आहेत. अनेक तोडणी मजुरांनी कोविडची पहिली लसही घेतलेली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर्स, नर्स, आशा वर्कर्सकडून जिल्ह्यातील सर्व गावातील ऊसाच्या शेतात जावून लसीकरण करण्यात येत आहे. कोल्हापूर हा राज्याती एकमेव असा जिल्हा आहे, जेथे एक लाखाहून अधिक तोडणी मजूर येतात. त्यांची मुले, कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिकही येथे येऊन चार महिने राहतात.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी प्राजक्ता जाधव यांनी सांगितले की, ऊस तोडणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय स्थानिकांच्या संपर्कात येतात. यामध्ये शेतकरी, विक्रेत्यांचा समावेश असतो. त्यांच्याकडून त्यांना धान्य मिळते १२ ते १५ तास काम केल्यानंतर अनेक मजूर देशी दारुच्या दुकानात जातात. त्यामुळे जाधव यांनी आपल्या पथकांना कामगारांच्या लसीकरणासाठी गावागावात पाठवले आहे.
जाधव यांनी सांगितले की, महिला तोडणी कामगार जेवण तयार करतात आणि पतीसोबत शेतात जाऊन मुलांची देखभाल करतात. ते संध्याकाळी परततात. आरोग्य कर्मचारी जेव्हा त्यांच्या झोपडीत जातात तेव्हा पुरुष नशेत असतात. त्यामुळे शेतातच लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.