कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी पाच तालुक्यातील ५८ मतदान केंद्रांवर २३ एप्रिल रोजी मतदान होईल. जिल्ह्यातील १२२ गावात पसरलेल्या एकूण १३,३५८ शेतकऱ्यांकडून पुढील पाच वर्षांसाठी २१ संचालकांच्या निवडीसाठी मतदान केले जाणार आहे. दोन अथवा तीन गावांसाठी संयुक्त बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर कमीत कमी १८० मतदार आहेत. कोल्हापूर शहरातील सेंट झेव्हियर्स स्कूलच्या मतदान केंद्रावर सर्वाधिक ३४८ मतदार आहेत. या बूथवर मतदान करणारे बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी आहेत, जे पंचगंगा नदीकाठी आपली शेती करतात.
२३ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी पाच वाजता त्याची समाप्ती होईल. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये मोठी ईर्ष्या पाहायला मिळत आहे. एका पॅनलचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि दुसऱ्या पॅनलचे नेतृत्व भाजप नेते महादेवराव महाडिक आणि त्यांचा मुलगा अमल यांनी केले आहे. आपल्यालाच विजय मिळावा यासाठी दोन्ही नेत्यांनी कोणतीच कसूर सोडलेली नाही. दोन्ही पॅनलचे उमेदवार आपल्या कार्यक्षेत्रात रॅली काढत आहेत. सतेज पाटील कसबा बावडा येथे मिरवणूक काढून प्रचाराची समाप्ती करतील अशी शक्यता आहे. २५ एप्रिल रोजी कोल्हापुरातील रमणमळा येथील मल्टी पर्पज हॉलमध्ये मतमोजणी होईल.