कोल्हापूर :गुरुवारी दुपारी बारा पर्यंत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून 5712 क्युसेक व विज निर्मिती केंद्रातून 1500 क्युसेक असा एकूण 7212 क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्र. 3, 4, 5 व 6 उघडले आहेत. जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली असून अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. राधानगरी, काळम्मावाडी, वारणा धरण पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले. विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होवून महापुराची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने राधागनरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद 8874 घनफूट, तर दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू केल्याने सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ‘पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली आहे. तब्बल 65 मार्ग व 81 बंधाऱ्यांवर पाणी आले आहे.
दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून 1000 क्यूसेक्स विसर्ग काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात जोरदार अतिवृष्टी झाल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून 1000 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील वाघबीळ ते शिवाजी पूल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.