कोल्हापूर : कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता वाढल्याने जिल्ह्यातील आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील डालमिया भारत शुगर अॅन्ड इंडस्ट्रीज लि. (दत्त साखर कारखाना) आणि कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने गाळप क्षमता वाढीचा निर्णय घेतला आहे. यापैकी डालमिया भारत कारखान्याने आगामी गळीत हंगामात प्रती दिन १२,००० टन गाळप परवाना मिळवला आहे. तर कुंभी कारखान्याने १०,००० टन गाळपाचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे सादर केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पेर क्षेत्राच्या ४६ टक्के क्षेत्रात ऊस उत्पादन होते. संपलेल्या हंगामातही अपेक्षेपेक्षा उसाची उपलब्धता झाल्याने वेळेत गाळप करताना सर्वच कारखान्यांची दमछाक झाली. ज्या कारखान्यांची गाळप क्षमता कमी आहे, त्यांच्यासमोर आल्या. त्यामुळे डालमिया शुगरने प्रती दिन ७२०० टनाची गाळप क्षमता असताना ९,००० टनापर्यंत गाळप केले. आता प्रती दिन १२ हजार टनाने गाळप केले जाणार आहे. तर कुंभी कारखान्याने यंदा १० हजार टन गाळप क्षमतेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. कारखान्याच्या पाच किलोमीटरच्या परिघात जवळपास ६५ टक्के ऊस उपलब्ध आहे.