कोल्हापूर:जिल्ह्यात सोमवारी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे.पावसाचा जोर आणि धरणातून होणारा विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे.तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर सायंकाळी तीन ठिकाणी पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पंचगंगा पाणी पातळीत वाढ सुरूच न असून, ती संथगतीने ४३ फूट या धोका पातळीकडे चालली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 40.8 फुट इतकी होती. नदीची धोका पातळी ४३ फुट असून पुराचा धोका वाढला आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पंचगंगा धोका पातळीकडे सरकत आहे.पाण्याची पातळी वाढत राहिल्यास पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांनी वेळेत स्थलांतरित होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.पूरस्थितीच्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेने २०२१ मध्ये शहरात महापुराचे पाणी आलेल्या ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. यामुळे पूर पातळी जशी वाढत जाईल, त्यानुसार शहरातील त्या-त्या ठिकाणच्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
कोल्हापूर शहरासह तीन तालुक्यात अतिवृष्टी…
जिल्ह्यात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासांत सरासरी ५१.३ मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडी (९२), पन्हाळा (७६.३) व गगनबावड्यात (७०.२) अतिवृष्टी झाली. कोल्हापूर शहरातही अतिवृष्टी झाली असून, गेल्या २४ तासांत ६८ मि.मी. पाऊस झाला. चंदगड तालुक्यात ५९.१ मि.मी., राधानगरीत ५६.५ मि.मी., करवीरमध्ये ५४.९ मि.मी., कागलमध्ये ४४.४ मि.मी., भुदरगडमध्ये ४३.८ मि.मी., आजऱ्यात ४३.४ मि.मी., हातकणंगलेत ४०.७ मि.मी., शिरोळमध्ये २५.४ मि.मी., तर गडहिंग्लज तालुक्यात २३.६ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील २२ ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.
राधानगरी ८७ टक्के भरले…
जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ आणि कोदे ही पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरण ८७ टक्के भरले. वारणा धरणही ८२ टक्के भरले आहे. यामुळे धरणातील वक्राकार दरवाजातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. चिकोत्रा, दूधगंगा व तुळशी वगळता उर्वरित सर्व १३ धरणांतून पाण्यांचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावरून सकाळी ५१ हजार २०७ क्युसेक विसर्ग सुरू होता. दुपारनंतर तो ५५ हजार ५३९ क्युसेक इतका वाढला. पन्हाळा तालुक्यातील आंबर्डे येथील दरड प्रवण क्षेत्रातील दोन कुटुंबातील १६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यासह कोल्हापूर शहरातील सुतारवाडा परिसरातील ४ कुटुंबातील २० नागरिकांना स्थलांतरित केले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात विविध ठिकाणी ५१ घरांची पडझड झाली.
१४ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी…
जिल्ह्यातील प्रमुख १६ धरणांपैकी चिकोत्र (५० मि.मी.) व आंबेओहोळ (३२ मि.मी.) वगळता उर्वरित १४ धरण क्षेत्रांत सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. कोदे धरण क्षेत्रात २६४ मि. मी., तर तुळशी परिसरात २३९ मि.मी पाऊस झाला. जंगमहट्टीत ८४ मि.मी. पाऊस झाला अन्य ११ धरण क्षेत्रांत १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला.