कोविड १९ : गाझियाबादमध्ये कलम १४४ लागू, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

गाझियाबाद : देशात कोरोना संक्रमणाचे वाढते रुग्ण पाहता खबरदारी म्हणून गाजियाबाद जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना संक्रमणापासून बचावासाठी कलम १४४ लागू केले असून ते १५ मार्चपासून १० मे २०२१ पर्यंत कायम राहील. चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स यांसह इतर संस्थांना संक्रमणापासून बचावासाठी गाइडलाइन जारी केल्या असून त्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अनिवार्य आहे. मास्क नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला दुकानदारांनी साहित्य देऊ नये. त्यांच्याशी व्यवहार करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. काही दिवसांवर आलेल्या होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर तेथेही कोरोनापासून बचावासाठी पावले उचलण्यात येत आहेत.

शैक्षणिक संस्था, शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्ससह सर्व ठिकाणी विना मास्क प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. हॉल अथवा बंदिस्त ठिकाणी २०० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. चित्रपटगृहात इंटरव्हलवेळी लोकांना एकत्र येण्यास, दुकानदारांना मास्क, हँडग्लोव्हजचा वापर अनिवार्य करण्याच्या सूचना आहेत. मिठाई दुकानात ग्राहकांना बसून खाण्याची परवानगी नाही. कंटेन्मेंट झोनमध्ये कोणत्याही सणाशी संबंधीत कार्यक्रम न करणे, दुचाकी वाहनधारकाांना मास्क अनिवार्य, टॅक्सी-कॅबमधून मास्कशिवाय प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी घरीच थांबावे असे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील लोकांनी मास्क, सॅनिटायझर अशा बाबींचा नक्की वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजय शंकर पांडेय यांनी केले आहे. नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here