सांगली : यावर्षी पाऊस चांगला आहे. पाणी योजनांची आवर्तने लांबणीवर पडली नसल्याने ऊस उत्पादन समाधानकारक मिळणार आहे. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना १० हजार मे. टन प्रति दिन क्षमतेने चालणार असल्याने शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठीविलंब लागणार नाही. त्यामुळे कारखान्याने यंदाच्या, २०२४-२५ या २३ व्या गाळप हंगामामध्ये १४ लाख मे. टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन आ. अरुण लाड यांनी केले. कारखान्याच्या गाळप हंगामासाठी मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक उदय लाड प्रमुख उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, कारखान्याकडे यंदा १४ हजार हेक्टर ऊस नोंद आहे. मागील हंगामापेक्षा २० टक्के कमी क्षेत्र नोंदवण्यात आले आहे. मात्र यंदा १४० दिवस कारखाना हंगाम चालू राहील आणि १४ लाख मे. टन गाळप होईल असा अंदाज आहे. यासाठी ऊस तोडणी वाहतुकीचे करार झाले आहेत. मजुरांनाही अॅडव्हान्स दिले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या नोंद क्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा. यावेळी उपसरपंच अर्जुन कुंभार, अँड सतीश चौगुले, श्रीकांत लाड, जगन्नाथ आवटे, सुकुमार पाटील, जितेंद्र पाटील, संजय पवार, बाळकृष्ण विभूते, दिलीप थोरबोले, अनिल पवार, बाळकृष्ण दिवाण, जयप्रकाश साळुंखे, अरविंद कदम, जगन्नाथ पाटील, कुंडलिक एडके, सुरेश शिंगटे आदी उपस्थित होते.