सांगली : क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना यंदा शेतकऱ्यांना २५ लाख शुद्ध ऊस रोपे उपलब्ध करून देणार आहे. ऊस लागणीसाठी रोपांचा वापर केल्यामुळे एकरी उत्पादनात ८ ते १० मे. टनाची वाढ होत आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस रोपांची वाढ झाली आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली. कारखान्याच्या नर्सरीमध्ये ऊस रोपे तयार करण्याच्या प्रारंभ प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमात टिश्यू कल्चर रोपांच्या वितरणास सुरुवात झाली.
अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, क्रांती कारखान्याच्या ऊसविकास योजनेतून तयार केलेल्या रोपांचा परिसरातील एकूण ऊस रोपांच्या लागणीत ५० टक्के वाटा आहे. शेतकऱ्यांना योग्य बियाणे मिळावे यासाठी आमदार अरुणअण्णा लाड सदैव प्रयत्नात आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही हा करत असलेला हा छोटासा प्रयत्न मोठा बदल घडवेल. कारखान्यामार्फत एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी दरवर्षी विविध ऊसविकास योजना राबविल्या जातात, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक सुकुमार पाटील, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, दिलीप थोरबोले, जितेंद्र पाटील, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे आदी उपस्थित होते.