सातारा : यंदाचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम कमी दिवसाचा असेल. त्यामुळे कृष्णा कारखान्याचे ऊस गाळप लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने कारखाना गळितासाठी लवकरच सज्ज होईल असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. य. मो. कृष्णा साखर कारखान्याच्या ६५ व्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अतुल भोसले म्हणाले, गेल्या ९ वर्षांत कारखान्यात महत्त्वपूर्ण बदल केले. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता प्रतिदिन ७ हजार २०० टनांपासून १२ हजार टनांपर्यंत नेली आहे. यावर्षी कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी गाळप करू.
अध्यक्ष डॉ. भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी उत्तरा भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी कृष्णा साखर कारखान्याच्या कामगारांना गेल्या वर्षीप्रमाणे दिवाळी सणानिमित्त दोन पगार बोनस देणार असल्याची घोषणा अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केली. कामगारांचा विमा उतरवण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी आश्वस्त केले. कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, अविनाश खरात, धोंडिराम जाधव, संजय पाटील, जे. डी. मोरे, जयश्री पाटील, वसंतराव शिंदे, दीपक पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, वैभव जाखले उपस्थित होते.