रेठरे बुद्रुक (जि. सातारा): ऊस तोडणी वाहतुकदार साखर कारखान्याचा अत्यंत महत्वाचा दुवा आहेत. त्यामुळे त्यांचे हित पाहणे देखील कारखान्याचे प्रथम कर्तव्य आहे. यासाठीच कृष्णा साखर कारखान्याने ऊस वाहतुक दरात 17 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील यशवंतराव मोहित कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी हा निर्णय जाहीर केला.
कृष्णा कारखान्याला ऊस वाहतुक करणारे वाहतुकदार हे बहुतांश कारखान्याचे सभासद आहेत. शेतीबरोबरच जोड व्यवसाय करण्यासाठी शेतकरी ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतात. या वाहतुकदारांना उत्तेजन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
दरवर्षी गाळप हंगामात कृष्णा कारखान्यास लागणार्या ऊसाची वाहतुक हे वाहतुकदार करत असतात. त्यांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी डॉ. भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. तोडणी यंत्रणेत पारदर्शकता यावी यासाठी नव्या तंत्राचा कौशल्याने वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे नव्या तंत्रज्ञानाला नोटराईज्ड ई करार पद्धतही राबवली गेली. या करारामुळे ऊस वाहतुकदारांच्या करारातही पारदर्शकता आली.
कृष्णा कारखाना व्यवस्थापनाने कायमच ऊस वाहतुकदारांच्या हितांच्या दृष्टीने विचार करुन निर्णय घेतले आहेत. त्यानुसार यंदाही 17 टक्क्यांची वाढ देण्याचा निर्णय घेवून एक पाउल पुढे टाकले आहे. हा निर्णय ऊस वाहतुकदारांसाठी दिवाळी इतकाच महत्वाचा आहे, त्यामुळे वाहतुकदारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.