सातारा :आगामी गळीत हंगामात उत्कृष्ट काम करून कृष्णा कारखान्याला देशात प्रथम क्रमांकाचा कारखाना बनवूया, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील य मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन उत्साहात झाले. यावेळी ते बोलत होते. सध्या कर्मचारी व अधिकारी यांच्यातील चांगल्या सुसंवादामुळे कारखान्याचे काम चांगल्या रीतीने सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष डॉ. भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलरची पूजा करण्यात आली. संचालक लिंबाजी पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, प्राचार्य डॉ. ए. एल. फरांदे, आदी उपस्थित होते. महावीर घोडके यांनी स्वागत केले. बाबासो शिंदे यांनी आभार मानले.