धाराशिव : बेंबळी येथील कुलस्वामिनी नॅचरल शुगर्सच्या गळीत हंगामातील सन २०२४-२५ चा रोलर पूजन सोहळा मोठ्या उत्साहात झाला. कारखान्याचे संस्थापक तथा धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे व चेअरमन आकाश तावडे यांच्या हस्ते विधिवत रोलर पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संस्थापक तावडे यांनी, यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याच्या माध्यमातून दीड लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट आहे, असे सांगितले.
संस्थापक तावडे म्हणाले की, यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडून नियोजन करण्यात आले आहे. ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज होत आहे. यंत्र सामुग्रीच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करुन कारखाना ऑक्टोबर महिन्यात सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी, जनरल मॅनेजर शरद गुंड, चीफ इंजिनिअर साळुंखे, चीफ केमिस्ट मोळे, मुख्य शेतकी अधिकारी तवले, चीफ अकौंटंट तौर, राजाभाऊ गुंड यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.