कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात कोल्हापूर विभागामध्ये कुंभी-कासारी, दालमिया कारखाना उताऱ्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी साखर कारखान्याने १२.८३ टक्के तर खासगीमध्ये दालमियाने १२.९३ टक्के साखर उतारा मिळवत विभागातच नव्हे तर राज्यात आघाडी घेतली आहे. तर जवाहर साखर कारखान्याने सर्वाधिक गाळप करून आघाडी घेतली आहे. साखर कारखान्यांचे हंगाम संपले असून आता पुढील हंगामाची तयारी सुरू झाली आहे.
यंदाच्या हंगामात विभागात २ कोटी ४० लाख ८२ हजार ७४१ मे.टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूरमध्ये २३ तर सांगलीतील १७ साखर कारखाने अशा ४० साखर कारखान्यांनी हंगाम यशस्वी केला आहे. जवाहर साखर कारखान्यान्याने १६ लाख १८ हजार ३०६ मे. टन उसाचे गाळप करून १९ लाख ७६५ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १,५९,९९,४९६ मे. टन ऊस गाळप झाले असून १,७८,२५,८५९ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ११.७३ टक्के आहे. सांगली जिल्ह्यात ८५,८३,२४५ मे. टन ऊस गाळप झाले असून १,००,४१८८६ साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.३ टक्के इतका आहे.