कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखान्याचा ३० केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प चालू हंगामात कार्यान्वित होणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणीस मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने साखरेला ४५ रुपये प्रती किलो हमीभाव द्यावा, अशी मागणी चेअरमन नरके यांनी केली. कुंभी कासारी कारखाना कार्यस्थळावर ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.
चेअरमन नरके म्हणाले की, को-जनरेशन व डिस्टीलरी प्रकल्पांनी ऊस दर देण्यात मोठे योगदान दिले आहे. भविष्यात शाश्वत इंधन म्हणून ‘सीबीजी’ (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) ची मागणी वाढणार आहे. आता डिस्टीलरी पेंट वॉश, साखर कारखाना पेस मड या स्रोतापासून सीबीजी तयार होणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात भर पडेल. पर्यावरणास पोषक व शाश्वत पर्यायी इंधन उपलब्ध होईल. सभेत प्रशांत पाटील यांनी नोटीस वाचन व वृत्तांत वाचन केले. बाळासाहेब खाडे यांनी विषय वाचन केले. कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याची मागणी भगवान पाटील यांनी केली. अजित नरके, राजेंद्र सूर्यवंशी, संभाजी पाटील, बाजीराव पाटील, संजय पाटील, युवराज पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने उपस्थित होते. कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वास पाटील यांनी आभार मानले.