कुशीनगर: थकीत ऊस बिलांमुळे दिवाळी साजरी न करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय

कुशीनगर : एकीकडे देशभर दिवाळी सणाची जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे कुशीनगरच्या शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत धरणे, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कप्तानगंज येथील साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत ठेवली आहेत. दिवाळी दिवशी, २४ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कप्तानगंज साखर कारखान्याकडे ४४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. दिवाळीपूर्वी हे पैसे देण्याचे आश्वासन मिळाले होते. माजी राज्यमंत्री राधेश्याम सिंह यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकार आणि कारखाना प्रशासन या ऊस बिलांच्या थकबाकी प्रकरणी बेफिकीर आहे असे ते म्हणाले.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांसमोर आंदोलनाशिवाय इतर कोणताही मार्ग शिल्लक नाही. पैसे न मिळाल्याने त्यांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यामुळे त्यांनी दिवाळी सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे माजी राज्यमंत्री राधेश्याम सिंह यांनी सांगितले. यापूर्वी ऊस तथा साखर उद्योग मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी विभागीय आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाईल असे त्यांनी सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here