कोल्हापूर : गेल्यावर्षी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी ३४११ रुपये ऊस दर दिला होता. तर यंदा कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने ३४०७ रुपये दर जाहीर करत राज्यात ऊस दरात आपणच भारी असल्याचे दाखवून दिले आहे.
कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष के. पी. पाटील यांनी पदाची धुरा हाती घेताच कारखान्याची आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक दराची परंपरा कायम राखली. चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला प्रती टन ३४०७ रुपये दर त्यांनी जाहीर केला. यापैकी प्रती टन ३२०० रुपये पहिली उचल आहे. हंगाम संपण्यापूर्वी उर्वरीत २०७ रुपये देणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले. हा दर राज्यात सर्वोच्च असल्याचा दावा कारखान्याने केला आहे.
गेल्यावर्षी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ३४११ रुपये ऊस दर दिला होता. तर ‘बिद्री’ कारखान्याने ३२०९ रुपये दर दिला होता. मागील हंगामात १२.६२ टक्के साखर उताऱ्यासह ८ लाख ८० हजार टनाचे गाळप करण्यात आले. यंदा कारखान्याची निवडणूक असल्याने दर जाहीर करता आला नव्हता. मात्र प्रचार सभेत के. पी. पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना सत्तेवर येताच दर जाहीर करण्याचा शब्द दिला होता. दरम्यान, इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्याने यापूर्वीच प्रती टन ३३०० रुपये दर जाहीर केला आहे. आता बिद्रीने त्यापेक्षा जादा दर दिला आहे. या कारखान्याने दराबाबत स्वत:हून पाऊल टाकले याचे स्वागत आहे अशी प्रतीक्रिया स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.