गतवर्षीच्या पुराने पाकिस्तान झाला बर्बाद, ४० देशांच्या यादीत सर्वाधिक कर्जदार देश

इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या ऐतिहासिक आर्थिक संकटात आहे. २०२२ मध्ये आशियाई डेव्हलपमेंट बँकेकडून दिल्या जाणाऱ्या योजनांची सर्वाधिक मदत या देशाला मिळाली आहे. एडीबीने सोमवारी जारी केलेल्या वार्षिक रिपोर्ट २०२२ नुसार, ४० देशांना करण्यात आलेल्या ३१.८ बिलियन डॉलर्सच्या एकूण वितरणापैकी पाकिस्तानला सर्वाधिक ५.८५ बिलियन डॉलरचे कर्ज मिळाले आहे. गेल्या वर्षी आलेला पूर हे पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडवण्यास महत्त्वाचे कारण ठरले आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एडीबीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, बँकेने आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील संकटांवेळी केलेल्या उपाययोजनांची माहिती जारी केली आहे. बँकेने पाकिस्तानबाबत म्हटले आहे की, पुरामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. यामध्ये जवळपास एक तृतियांश पिके नष्ट झाली. त्यातून अन्न पुरवठा विस्कळीत होऊन महागाई गगनाला भीडली. एडीबीच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानला २०२२ मध्ये सर्वाधिक निधी मिळाल्याचे जियो टिव्हीने म्हटले आहे.

तर एक्स्प्रेस ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार, एडीबीने आशियात ३१.८ अब्ज डॉलरचा निधी विविध योजनांना दिला आहे. एडीबी आणि इतर भागिदारांनी पाकिस्तानला ५.५ बिलियन डॉलरच्या योजना दिल्या तर २०२२ मध्ये पाकिस्तानला २ बिलियन डॉलर आणि ६० मिलियन डॉलरचे कर्जही सवलतीत दिले. अहवालानुसार, पुरामुळे पाकिस्तानचे ३० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. यामध्ये १,७३० लोकांचा मृत्यू झाला तर ३३.३ मिलियन लोकांना याचा फटका बसला. पूरग्रस्त क्षेत्रांसाठी पाकिस्तानला १.५ बिलियन डॉलर निधी देण्यात आला. सद्यस्थितीत पाकिस्तान आयएमएफसोबत स्टाफ लेव्हल अॅग्रिमेंटच्या प्रतीक्षेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here