लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी लोकनेते विलासराव सहकार विकास पॅनलने २१ जागांसाठी २१ जणांचे नामनिर्देशन फॉर्म जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेत मंगळवारी (ता. एक) दाखल केले. नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख यांचा समावेश आहे. नामनिर्देशन अर्ज भरण्याअगोदर जिल्हा परिषदेच्या आवारातील विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पॅनलच्या सर्व उमेदवारांनी अभिवादन केले.
गेल्या चार दशकांपासून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्थापन केलेला मांजरा साखर कारखाना अविरत सुरू आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये नीलकंठ बचाटे (टाकळी), सचिन शिंदे (सावरगाव), दयानंद बिडवे ( मुरुड अकोला), तात्यासाहेब देशमुख (पाखरसांगवी), धनराज दाताळ (बोकनगाव), ज्ञानेश्वर पवार (साई), वसंत उफाडे (टाकळी ब), अशोक काळे (चिकुर्डा), कैलास पाटील (रुई), मदन भिसे (गादवड), नवनाथ काळे (बोरगाव), पठाण शेरखान (आंदोरा ), श्रीशैल्य उटगे (कवठा), सदाशिव कदम (लखनगाव), निर्मला विलास चांगले ( धनेगाव), छायाबाई अरुण कापरे (जोडजवळा), अनिल दरकसे (जेवळी), शंकर बोळंगे (भातांगळी), बाळासाहेब पांढरे (मुरुड अकोला) यांचा समावेश आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, जगदीश बावणे, प्रवीण पाटील, सचिन दाताळ, हरिराम कुलकर्णी, शशिकांत कदम, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.