लातूर : मांजरा साखर कारखान्यात ३ लाख १६ हजार क्विंटल साखर उत्पादन

लातूर : लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ३ लाख १६ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याने यंदाच्या हंगामात ३,२३,६०१ मे. टन उसाचे गाळप केले आहे. मांजरा परिवाराचे प्रमुख तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी यंदाच्या हंगामात कारखान्याकडे गाळपास उसाला किमान ३ हजार रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे दर देण्याचे जाहीर केले. यापूर्वी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना २ हजार ७०० रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे पैसे अदा केले आहेत. आता १०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे दुसरा हप्ता पुरवठादारांच्या ऊस खात्यावर जमा केला आहे.

मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे झाला आहे. त्यामुळे कारखान्याने शंभर रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे दुसरा अंतरिम हप्ता बुधवारी जमा केला आहे. आता जाहीर केल्याप्रमाणे लवकरच उर्वरित ऊसदरही अदा केला जाणार आहे, अशी माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, कारखान्याने वीज वितरण कंपनीस १,९१,२९,५४३ केडब्ल्यूएच विजेची निर्यात केली आहे. ज्यूस सिरप व बी हेवीसह सरासरी साखर उतारा ११.८६६ टक्के प्राप्त झाला आहे. अर्कशाळा विभागाकडून ६२,२४,६२० लिटर आर. एस. व ४४,४८,७५६ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून उसाची वाढ कमी असतानाही यावर्षी गळीत हंगाम यशस्वी झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:
सोलापूर : श्री संतनाथ सहकारी साखर कारखान्याला भीषण आग

 

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here